पुणे : शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यास्ते काल एस.पी.कॉलेजच्या मैदानावर केले जाणार होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस पडल्याने मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. तसेच हवामान विभागा मार्फत ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला. मात्र आता याच प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी २९ सप्टेंबर रोजी ऑनलाईनच्या माध्यमातून केले जाणार आहे.

हेही वाचा : पुणे : पूरस्थितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरज काय? कोणी मांडली ही अजब भूमिका

अगोदरच मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकार्पण करण्यास विलंब करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी आक्रमक होत शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील मेट्रो स्थानक येथे आंदोलन केले. आज मेट्रो सुरू झाल्या शिवाय आम्ही या ठिकाणापासून हटणार नाही, अशी भूमिका पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर, शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. तसेच यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. आंदोलनांच्या ठिकाणी कोणताही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.