पुणे : वीज देयकावरील नावात बदल करण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या धनकवडी उपविभाग कार्यालयातील प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध रात्री उशीरा सहकारनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी आशिष ज्ञानोबा क्षीरसागर (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारदाराने त्यांच्या आईच्या नावे सदनिका खरेदी केली. सदनिकेच्या मूळ मालकाच्या नावावर वीज देयक होते. वीज देयकावर आईचे नाव लावण्यासाठी तक्रारदार धनकवडीतील महावितरणच्या उपविभाग कार्यालयात गेले होते. उपविभाग कार्यालयातील प्रशिक्षणार्थी कर्मचारी क्षीरसागर याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाच मागितली.
हेही वाचा : राज्य सरकारच्या शिष्यवृत्तींसाठी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद… आता काय होणार?
त्यानंतर तक्रारदाराने तडजोडीत ८०० रुपये लाच देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून क्षीरसागरला ८०० रुपयांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.