पुणे : घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.

भीमराव मुकिंदा कांबळे (वय २७, मूळ. रा. सांडस, ता. कळमनरू, जि. हिंगोली) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित १४ वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना डिसेंबर २०१७ मध्ये घडली होती. पीडित मुलीच्या घराशेजारी कुक्कुटपालन व्यवसाय होता. आरोपी कांबळे तेथे काम करायचा. मुलगी घरी एकटी होती. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी कांबळे तिच्या घरात शिरला. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला, तसेच या प्रकाराची कोणाकडे वाच्यता करु नको, अशी धमकी त्याने तिला दिली होती. पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर बलात्कार प्रकरणाला वाचा फुटली होती.

हडपसर पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन आरोपी कांबळेला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील घोगरे पाटील यांनी युक्तिवादात केली. साक्ष, तसेच वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी कांबळेला २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, तसेच दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची तरतूद निकालपत्रात करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कर्मचारी ए. जे. गोसावी यांनी सहाय केले.