पुणे : प्रेयसीबरोबर फिरत असल्याने तरुणाचा निर्घृण खून करणाऱ्या एकास सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रमजान ईदच्या दि‌वशी शिरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून, त्याचा खून करून, मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आल्याची घटना स्वारगेट भागात घडली होती. निजाम असगर हाश्मी (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. उमेश भीमराव इंगळे असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक बसवराज उजने यांनी फिर्याद दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ जून रोजी कोंढवा भागात मृतदेह सापडला होता. शिर धडावेगळे करण्यात आले होते. खून प्रकरणाचा तपास करुन कोंढवा पोलिसांनी आरोपी निजामला अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून २४ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. आरोपीकडून खून करण्यासाठी वापरलेला सत्तुर, तसेच उमेश इंगळेचे पॅनकार्ड जप्त करण्यात आले होते.

हेही वाचा : आळंदी: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलं माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन

हाश्मी याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. उमेश तरुणीबरोबर फिरत असल्याने निजाम त्याच्यावर चिडून होता. त्याने रमजान ईदच्या दिवशी उमेशला शीरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्याच्यावर सत्तुरने वार केले. उमेशचे शीर धडावेगळे करुन मृतदेह कोंढवा भागात टाकण्यात आला होता. शीर स्वारगेट येथील कालव्यात टाकून देण्यात आले होते. कोंढवा पोलीस ठाण्यातील तत्कालिन निरीक्षक संतोष शिंदे यांनी याप्रकरणाचा तपास केला होता. न्यायालयीन कामकाजात उपनिरीक्षक समाधान मचाले, सहायक फौजदार महेश जगताप, शिपाई अंकुश केंगले यांनी सहाय्य केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune man sentenced to life imprisonment for killing young boy who walks with his girlfriend pune print news rbk 25 css