पुणे : गणेशोत्सवानंतर दोन दिवसांत मंडप, कमानी काढण्याच्या हमीवर परवानगी घेतलेल्या सार्वजनिक मंडळांचे मंडप, कमानी आणि विसर्जन मिरवणुकीतील रथ रस्त्यावरच उभे आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असून, त्याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागानेही मुदतीमध्ये मंडप न काढणाऱ्या २२ सार्वजनिक गणेश मंडळांवर कारवाई केली केली असून, काही मंडळांना नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गणेशोत्सवासाठी मंडळांसाठीची नियमावली महापालिकेकडून जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार कमानीची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून १८ फुटांपेक्षा जास्त ठेवून उत्सवानंतर मंडळांनी पुढील तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने मंडप, कमानी, रनिंग मंडप, रस्त्यावरील देखावे, विटांची बांधकामे हटवून रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने हटविणे बंधनकारक करण्यात आले होते. उत्सवानंतर दोन दिवसांच्या आता मंडप काढण्याचे बंधनही मंडळांवर घालण्यात आले होते. या अटींवरच महापालिकेने मंडळांना परवानगी दिली होती.
हेही वाचा – पिंपरी : आंदोलनाच्या गुन्ह्यात खासदार बारणे यांच्यासह चौघे निर्दोष
मात्र विसर्जनानंतरही अनेक मंडळांनी मिरवणुकीतील रथ, उत्सवाच्या काळातील मंडप हटविलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरांत विसर्जन रथ रस्त्यावरच असल्याने वाहतुकीलाही अडथळा होत असून, त्याबाबतच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दखल घेण्यात आली असून, मुदतीमध्ये न काढणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कमानी मंडप, विसर्जन रथ न हटविल्यामुळे २२ मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही मंडळांना नोटीस बजाविण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, मोटारीच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
मंडप न काढणाऱ्या २२ मंडळांवर कारवाई करण्यात आली असून, अनधिकृत जाहिरात फलक, कापडी फलक काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. – माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण निर्मुलन विभाग, पुणे महापालिका