पुणे : गुढी पाडव्याला शहरात आंब्याला मागणी कमी राहिली. घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने आणि आंब्याचे दर तेजीत असल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याला आंब्यांना मागणी वाढते. यंदा प्रतिकूल वातावरणामुळे आंब्यांच्या लागवडीत घट झाली. लागवड कमी झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुढी पाडव्याला आंब्यांची आवक कमी झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने यंदा आंब्यांचे दर तेजीत आहेत.
एक डझन हापूसचे दर ८०० ते १५०० रुपयांपर्यंत राहिले. गेल्या वर्षी गुढी पाडव्याला हापूसचे दर ५०० ते ७०० रुपयांपर्यंत होते. ‘आंबा महाग झाल्याने गुढी पाडव्याला फारशी मागणी नव्हती. आंबा खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी करण जाधव यांनी दिली.
मार्च महिन्यात आंब्यांची आवक वाढते. साधारणपणे कोकणातून दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात होते. सध्या बाजारात दररोज एक ते दोन हजार पेटी आंब्यांची आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत बाजारात आंब्यांची आवक कमी होत आहे. यंदाच्या हंगामात आंब्याचे दर तेजीत राहणार आहेत.