पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे. मात्र अद्यापही राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याने राज्यातील अनेक भागात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. त्याच दरम्यान पुण्यातील डीपी रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि वंचित विकास संस्थेच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ उपक्रमाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते.
मात्र उदय सामंत कार्यक्रमास आले नाही. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तर कार्यक्रमाच्या बाहेर लावण्यात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फ्लेक्स देखील फाडण्यात आले.
हेही वाचा : पुणे : कांद्याचा तुटवडा; दोन महिने दर तेजीत, सरासरी दर ४२ ते ६० रुपयांच्या दरम्यान
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आठ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. त्यावर राज्य सरकार कोणत्याही प्रकारे निर्णय घेत नाही.पण या सरकारमधील मंत्री अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. जोवर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोवर आम्ही एकाही मंत्र्याचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.