पुणे : महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरून हे ‘व्होट जिहाद’ असल्याची भारतीय जनता पक्षाने केलेली टीका हा दुष्प्रचार आहे, असा आरोप मराठी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. ज्याचे विचार पटतील त्या पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेला आहे, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली.
मराठी मुस्लिम सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इब्राहिम खान यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. संघाचे राज्य सहसचिव अब्दुल जब्बार शेख, शहराध्यक्ष जावेद शेख, सिकंदर मुलाणी, अस्लम बागवान या वेळी उपस्थित होते. मागील निवडणुकीत ‘सब का साथ, सबका विकास’ ऐकून भाजपला पाठिंबा दिला तेव्हा तो व्होट जिहाद नव्हता का?, असा सवाल उपस्थित करून या विषयावर जाहीर चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे इब्राहिम खान यांनी सांगितले. मुस्लिमांच्या आत्मसन्मानाशी खेळण्याचे काम भाजपने केले, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा : Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
u
े
किरीट सोमय्या यांनी मुख्तार अब्बास नक्वी, माधव भंडारी, डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून २०१४ च्या निवडणुकीत आम्ही दिलेल्या पाठिंब्याबाबत माहिती घ्यावी. भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणा देऊन ध्रुवीकरणाचे प्रयत्न करू नयेत, याकडे खान यांनी लक्ष वेधले. मराठी मुस्लिम सेवा संघ आत्मसन्मान, राज्यघटनेने दिलेले अधिकार, रोजगार, प्रादेशिक अस्मिता या मुद्द्यांवर काम करते. आमच्या प्रगतीसाठी महाविकास आघाडीला आणि भाजपला हरविण्यास जे सक्षम आहेत, त्यांना मतदान करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
मुस्लिम हे राक्षस, देशद्रोही असल्याचे चित्र रंगविण्याचे प्रयत्न होत आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने लढणाऱ्या मुस्लीम सैनिकांचे वंशज आहोत, औरंगजेबची औलाद नाही, हे लक्षात ठेवावे.
सिकंदर मुलाणी, मराठी मुस्लिम सेवा संघ
© The Indian Express (P) Ltd