पुणे : गुढीपाडव्याच्या शुभ मुहू्र्तावर सोने, चांदीच्या खरेदीसाठी रविवारी सराफी बाजारांमध्ये नागरिकांनी गर्दी केली. सोन्याच्या भावाने पुण्यात रविवारी तोळ्याला ९० हजार रुपयांची पातळी गाठली होती.
गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी दिसून आली. सोन्यामध्ये हलक्या वजनाच्या दागिन्यांना जास्त पसंती आहे. मुहूर्ताची खरेदी म्हणून वेढणी आणि सोन्या, चांदीची नाणी खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल होता. विशेष म्हणजे, ग्राहकांचे लक्ष हे सोन्याबरोबरच हिऱ्याकडे वळले आहे. हिरे हे आधी ग्राहकांना महाग वाटत असत. परंतु, आता सोन्याच्या किमतीतील वाढीमुळे सोने आणि हिरे एकत्रित करून घडणारे दागिने ग्राहक खरेदी करीत आहेत. कारण असे दागिने सोन्याच्या मोठ्या दागिन्यांच्या किमतीत मिळत आहेत. पुण्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ९० हजार २०० रुपयांवर पोहोचला तर चांदीचा भाव प्रतिकिलोला १ लाख ४ हजार ५०० रुपयांवर गेला, अशी माहिती सराफी व्यावसायिकांनी दिली.
चांदीच्या वस्तूंना चांगली मागणी होती. मात्र, भाव वाढल्यामुळे चांदीच्या हलक्या वजनाच्या शुभ वस्तूंच्या खरेदीला ग्राहकांचे प्राधान्य होते. त्यात चांदीचे करंडे, कोयऱ्या यासारख्या वस्तूंना ग्राहकांची अधिक मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुढीपाडव्याला वजनाच्या प्रमाणात सोने, चांदीच्या विक्रीत ८ ते १० टक्के घट झाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत भावाच्या प्रमाणात विक्री १० टक्क्यांनी वाढली. कारण मागील काही काळात सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा विक्री कमी राहूनही एकूण उलाढालीत वाढ झाली, असे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
सोन्याचा भाव चढा असताना देखील सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. सायंकाळनंतर त्यात चांगली वाढ दिसून आली. ग्राहकांचा कल प्रामुख्याने दागिने खरेदी करण्याकडे होता. काळानुसार पारंपरिक व नव्या डिझाईनचे दागिने कमी वजनात उपलब्ध असल्याने ग्राहकांना दागिने निवडण्यास वाव होता. हिऱ्याच्या दागिन्यांनाही मागणी होती, असे पीएनजी एक्सक्लूसिव्हचे अभय गाडगीळ यांनी सांगितले.
भावातील तेजी कायम राहणार
आगामी काळातही सोने आणि चांदीच्या भावातील तेजी कायम राहणार आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इतर देशांवर जादा आयात शुल्क आकारले जात आहे. येत्या ३ एप्रिलला जादा शुल्क आकारणी करण्यात येणाऱ्या वस्तूंची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याचा अंदाज आहे. सोने आणि बिटकॉईनमधील गुंतवणूक परावर्तित करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्याचा परिणाम सोने, चांदीच्या बाजारावर होऊ शकतो. आयात शुल्कातील वाढीमुळे सोन्याचा डॉलर मूल्यातील भाव वाढत राहू शकतो. डॉलर मजबूत होत गेल्यासही सोने आणि चांदीचे भाव वाढत राहतील, अशी माहिती पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे मुख्याधिकारी अमित मोडक यांनी दिली.