पुणे : लाडक्या गणरायाचे स्वागत करण्याच्या उद्देशातून पूजा साहित्य आणि सजावट करण्याचे साहित्य खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात शुक्रवारी गर्दी झाली होती. धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील रस्ता बंद ठेवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली. वैभवशाली गणेशोत्सवास शनिवापासून सुरुवात होत आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी पूजा साहित्य, सजावट करण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. पूजा साहित्याच्या खरेदीसाठी मंडई, शनिपार, हुतात्मा बाबू गेनू चाैक परिसर तर सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बोहरी आळी, बुधवार पेठ येथील इलेक्ट्रिक वस्तूंची बाजारपेठ अशी शहराच्या मध्य भागात गर्दी झाली होती. हरतालिकेचा उपवास असल्याने गृहिणींसह अनेकजण खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. खरेदी करताना एकजण वाहनावर बसून असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर पडली होती.
हेही वाचा : “ईट का जबाब पत्थर से..”, आंदेकर खून प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांकडून गुंडांना इशारा
गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्याचा परिणाम नारायण पेठेत टिळक चाैकापासून ते आप्पा बळवंत चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेकांनी नदीपात्रातील रस्त्याने जाऊन खरेदी करण्याचा बेत आखला होता. मात्र, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने त्या वाहनांचाही ताण आल्याने मध्य भागामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.