पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वाढते महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकार राज्यात एआय विद्यापीठ सुरू करणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. येत्या जूनमध्ये ‘एआय’ विद्यापीठ सुरू होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (सीएसीपीई) आणि एमईएसचे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे आयोजित ‘बीसी टू एडी’ (बिफोर चॅट जीपीटी टू एआय डिसरप्शन) या परिषदेचे उद्घाटनावेळी पाटील बोलत होते. महाराष्ट्रीय मंडळ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, एमईएसचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, एमईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले, शिक्षण संचालक नेहा दामले, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत, सीएसीपीईचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, परिषदेच्या समन्वयिका डॉ. श्रद्धा नाईक या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘आज देशात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशीयल इंटेलिजन्स वापराचे प्रमाण वाढत आहे. या क्षेत्रात देशाने उशिराने सुरुवात केली असली, तरी नजीकच्या भविष्यात आपला देश त्यामध्ये मोठी प्रगती करेल. आता प्रत्येक क्षेत्रातच ‘एआय’चा वापर वाढत आहे. राज्यामध्ये नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर भविष्यकाळात ‘एआय’च्या वापरावर अधिक भर देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा प्रयत्न आहे.’

पालकमंत्र्यांची नेमणूक ‘एआय’द्वारे

काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये भाजपच्या अधिवेशनात राज्याचे माहिती-तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चा सुरू असताना त्यांनी ‘एआय’चा वापर, उपयुक्ततेचे प्रात्यक्षिक दाखवले. राज्यात विविध शहरांतील पालकमंत्री नेमण्याची प्रक्रिया झाली नव्हती. शेलार यांनी ‘एआय’च्या माध्यमातून पालकमंत्र्यांची यादी करून दाखवली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि त्यांना ही यादी दाखवल्यावर त्यांनी ही यादी सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार करण्याची सूचना केली, त्यानुसार यादी काढली. त्यामुळे सध्याचे पालकमंत्री हे ‘एआय’चा वापर करून नेमण्यात आल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितला.