पुणे : ‘नालंदा विद्यापीठासारखे शैक्षणिक वैभव पुन्हा आणायचे आहे. गेल्या काही वर्षांत खासगी विद्यापीठांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवीधर तयार न करता ज्ञानवंत विद्यार्थी घडवावेत. तसेच, गरीब विद्यार्थ्यांनाही खासगी विद्यापीठात शिकण्याची संधी मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत,’ अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा) या संघटनेतर्फे श्री बालाजी विद्यापीठ येथे आयोजित ‘खासगी विद्यापीठांचे सक्षमीकरण’ या परिषदेत पाटील बोलत होते. ‘पेरा’चे अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, श्री बालाजी विद्यापीठाचे कुलपती प्रा. प्रेमनंदन बालासुब्रमण्यम, कुलगुरू डॉ. गंगाधर शिरुडे, ‘पेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हणुमंत पवार, कुलसचिव डाॅ. एस. बी. आगाशे या वेळी उपस्थित होते. राज्यातील २८ खासगी विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग घेतला.
‘बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर खासगी विद्यापीठांनी स्वतःला अद्ययावत करून सकारात्मक बदल केले पाहिजेत. तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन विद्यापीठाचे प्रमुख स्तंभ असलेले प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यावर काम केल्यास येणारा काळ खासगी विद्यापीठांसाठी सुवर्णकाळ असेल,’ असे डॉ. कराड यांनी सांगितले. राज्यातील शासकीय, अभिमत आणि खासगी विद्यापीठांनी एकत्र येऊन, एकमेकांना सहकार्य करून राज्यातील शैक्षणिक क्षेत्राची गुणवत्ता जगात पोचवली पाहिजे. त्यासाठी शासनाचा भक्कम पाठिंबा असेल,’ असे डॉ. देवळाणकर यांनी नमूद केले.