पुणे : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आज तानाजी सावंत हे पुण्यातील एस.एम.जोशी हॉल येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांना तानाजी सावंत यांनी उत्तर दिले. त्यावेळी एका पत्रकाराने सावंत यांना विचारले की, “मागील काही महिन्यांपूर्वी तुम्ही एक विधान केले होते. २०२४ पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल, असे विधान तूम्ही केले होते. तर अद्यापही मराठा आरक्षण हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे तुम्ही राजीनामा देणार का?” या प्रश्नावर तानाजी सावंत त्यावेळी तेथून ते निघून जात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुण्यात शासकीय विश्रामगृहाबाहेर राडा; मराठा आणि भुजबळ समर्थक कार्यकर्ते आमने-सामने

“राजीनाम्याच्या प्रश्नावर तुम्ही पळ काढू नका साहेब”, असा प्रश्न पुन्हा विचारताच थोडेसे पुढे गेलेले तानाजी सावंत पुन्हा मागे येऊन पत्रकाराच्या खांद्यावर हात ठेवत आणि त्याच्या गालास हात लावून ‘थोडं शांत’ असं म्हणाले, त्यामुळे तानाजी सावंत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भडकल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

त्यानंतर ते पुढे म्हणाले की, “मी पळ काढत नाही. तर जे चाललं आहे, ते तुम्ही देखील पाहता आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पत्रकारांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये”, अशी भूमिका यावेळी सावंत यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune minister tanaji sawant gets angry on reporter when asked about his resignation on maratha reservation svk 88 css