पिंपरी : दिघीतील लष्कराच्या तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीचेशिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत भरधाव मोटार चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे – नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडला.

अमोद कांबळे (वय २७, रा. भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मूर्तजा अमीरभाई बोहरा (वय ३२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन आरोपी मुलाचे वय १७ वर्षे १० महिने आहे. आरोपी मुलगा मुळचा आसामचा असून तो दिघीतील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडील लष्करात जवान असून आसाम सीमारेषेवर कार्यरत आहेत. अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्राच्या मोटारीमधून भोसरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने येत होता. त्याने दारू प्राशन केली होती. त्याच्यासमवेत त्याचा एक मित्रही मोटारीत होता. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता. असे असताना मद्याच्या नशेत तो भरधाव वाहन चालवित होता.

हेही वाचा : “शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात

पुणे – नाशिक महामार्गावर महावितरणच्या कार्यालयासमोर मुलाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. मोटार रस्ता दुभाजकावरून विरूद्ध बाजूला गेली. याचवेळी पुण्याहून नाशिककडे जाणार्‍या रिक्षा आणि दोन दुचाकींना भरधाव मोटारीने ठोकरले. त्यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर, दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. आरोपी अल्पवयीन मुलाला बालन्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. फौजदार पंकज महाजन तपास करीत आहेत.

हेही वाचा : “शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात

दरम्यान, सात जुलै रोजी पिंपळे-सौदागरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत सीआयडीच्या पोलीस हवालदाराचा मृत्यु, सात ऑगस्ट पिंपळे-गुरव येथे मद्य प्राशन केलेल्या मोटार चालकाने दुचाकीवरील दोघांना फरफटत नेले, एक नोव्हेंबर रोजी रावेतमध्ये लक्ष्मीपुजनादिवशी फटाके उडवीत असताना भरधाव मोटारीच्या धडकेत अभियंत्याचा मृत्यु झाला.