पुणे : सिंहगड रस्त्यावरील काही भागांमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. या आजाराच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे. यासाठी महापालिका तसेच संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रासने यांनी बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांची भेट घेत चर्चा केली. या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावेत.
रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी केली. तसेच पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता नियमितपणे ठेवावी आणि पाणी शुद्धीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या दोन दिवसात संशय रुग्णांची संख्या २८वरून ७५ वर पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. हा आजार संसर्गजन्य नसून आवश्यक ती काळजी घेतल्यास यावर मात करता येते असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे.
या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने टास्क फोर्स ची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून बैठकांचे आयोजन केले जात आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन तसेच विभागीय आयुक्त स्तरावर देखील याबाबत बैठका सुरू आहेत. ज्या परिसरात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे तेथील पाण्याचे तसेच अन्नाचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले असून त्याचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे. त्यानंतर या आजाराच्या रुग्णांची संख्या कशामुळे वाढत आहे, याचे कारण समोर येऊ शकेल, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.