पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यांपासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान लोकसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना अजित पवार, सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात दौरे आणि मेळावे घेत आहेत. यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असे जवळपास निश्चित मानले जात आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्या विधानसभा मतदार संघनिहाय पुण्यातील मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. तर या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित आहेत. त्याच दरम्यान मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
त्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले की, कात्रज डेअरीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत पुणे महापालिका आयुक्तांमार्फत चुकीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्या संदर्भात सह्यांची मोहीम हाती घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील हा प्रश्न मांडला. पण काही मार्ग निघाला नाही. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा कात्रज भागात येतो. त्यामुळे आज खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यास आलो होतो. त्यावेळी शरद पवार यांची भेट झाली आणि त्यांना देखील निवेदन दिले. या प्रश्नावर लक्ष घालून मार्ग काढला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : विज्ञान दिनी विज्ञानप्रेमींना मेजवानी! खुला दिवस, शास्त्रज्ञ संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन
तसेच ते पुढे म्हणाले की, यामधून कोणत्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढू नये, माझ्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. अनेक नेते मंडळी विविध प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांची देखील भेट घेतात. त्यानुसार माझी आजची ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही बारामती की पुणे मतदार संघामधून इच्छुक आहात, त्या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले की, पुणे लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असल्याने तुम्ही कोणत्या मार्गावर आहात, त्या प्रश्नावर उत्तर देताना, मी राज मार्गावर असल्याचे सांगत त्यांनी इतर प्रश्नांवर बोलणे टाळले.