पुणे : शहरात पादचाऱ्यांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. हडपसर भागात पादचारी तरुणाचा मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. तरुणाने चोरट्यांना विरोध केला. तेव्हा दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाला फरफटत नेले, तसेच दुचाकीस्वार चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने तरुणाच्या हाताचा चावा घेतला.

त्यानंतर तरुणाचा मोबाइल चोरुन चोरटे पसार झाले. याबाबत एका तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुण हडपसर भागातील भगीरथीनगर परिसरात राहायला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पादचारी तरुण भगीरथीनगर परिसरातून निघाला होता. सोसायटीकडे वळत असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. तरुणाने त्यांना विरोध केला, तसेच चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्याने तरुणाला २०० ते ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. दुचाकीस्वार चोरट्याबरोबर असलेल्या साथीदाराने तरुणाच्या हाताचा चावा घेतला. झटापटीत तरुणाच्या गुडघ्याला दुखापत झाली.

हेही वाचा…मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार

तरुणाकडील मोबाइल संच चोरुन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत. शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत शहरात लुटमारीच्या १६७ हून जास्त घटना घडल्या आहेत.

Story img Loader