पुणे : पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मागील काही महिन्यांत घट झालेली दिसून आली आहे. ही प्रवासी संख्या वाढविण्याचे प्रयत्न महामेट्रोकडून सुरू आहेत. आता प्रवासी वाढत नसतानाही मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रुबी हॉल ते रामवाडी आणि जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या विस्तारित मार्गांवरील सेवा नवीन वर्षापासून सुरू होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे मेट्रोची मार्गिका एक – पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि मार्गिका दोन – वनाझ ते रुबी हॉल या विस्तारित मार्गांवरील सेवा १ ऑगस्टपासून सुरू झाली. त्यानंतर मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ७० हजारांवर पोहोचली. दोन महिन्यांनंतर दैनंदिन प्रवासी संख्येत घसरण होऊन ती आता ५० हजारांवर आली आहे. प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान त्यामुळे मेट्रोसमोर आहे. त्यातच आता मेट्रोने फेऱ्या वाढविण्याचे नियोजन केले आहे. प्रवासी संख्या कमी असताना आणि विस्तारित मार्ग सुरू होण्याआधीच फेऱ्या वाढविण्याचे पाऊल मेट्रोने उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांची कचरा सेवा शुल्कातून सुटका; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू आहे. सध्या दिवसभरात मार्गिका एकवर ८१ फेऱ्या होत असून, नवीन वर्षात १ जानेवारीपासून ११३ फेऱ्या होणार आहेत. तसेच, मार्गिका दोनवर ८० फेऱ्या होत असून, १ जानेवारीपासून १११ फेऱ्या होणार आहेत, असे महामेट्रोने म्हटले आहे. दरम्यान, विस्तारित मार्गावरील सेवा सुरू होण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. रूबी हॉल ते रामवाडी मार्गाचे काम पूर्ण होत आले असले तरी त्याची केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : येरवडा कारागृहातच खून, कैद्याला कात्रीने भोसकले

दोन्ही मार्गिकांवर धावणार आठ मेट्रो गाड्या

गर्दीच्या वेळात मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर ६ मेट्रो गाड्या धावतात. आता १ जानेवारीपासून दोन्ही मार्गिकांवर ८ मेट्रो गाड्या धावतील. तसेच कमी गर्दीच्या वेळात दोन्ही मार्गिकांवर ४ मेट्रो गाड्या धावत आहेत. आता १ जानेवारीपासून दोन्ही मार्गिकांवर ६ मेट्रो गाड्या धावणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune more metro trips and low passengers situation pune print news stj 05 css