पुणे : गणेशोत्सव ‘स्वच्छ’ व्हावा आणि संस्कृतीसोबत निसर्गाचेही संवर्धन व्हावे या उद्देशाने यंदाही स्वच्छ सेवकांकडून घाटांवरील निर्माल्य संकलन केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील दोनशेहून अधिक कचरावेचकांना ४० घाटांवर नियुक्त करण्यात आले आहे. निर्माल्य नदीत जाऊ नये, यासाठी स्वच्छ सेवक काम करणार आहेत. गेल्या १५ वर्षांपासून शहरातील सर्व प्रमुख विसर्जन घाटांवर स्वच्छ संस्थेचे कचरावेचक सर्व प्रमुख विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन उपक्रम राबवीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचव्या आणि अनंत चतुर्दशीदिनी २०० हून अधिक कचरावेचक काम करणार आहेत. सन २००७ पासून सुरू झालेल्या या उपक्रमातून दर वर्षी अंदाजे १०० टनांहून अधिक निर्माल्य गणपती विसर्जनादरम्यान खतनिर्मितीसाठी कचरावेचक वेगळे गोळा करतात. फुले, पाने, दुर्वा इत्यादी निर्माल्य पूजेनंतर कचऱ्यात किंवा नदीमध्ये न जाऊ देता महानगरपालिकेतर्फे खतनिर्मितीसाठी पाठवले जाते. यंदाही संकलित केलेले निर्माल्य वेगवेगळे करून ते खतनिर्मितीसाठी पाठविण्यात येणार आहे.

हेही वाचा : देखावे पाहण्यासाठी आजपासून गर्दी; पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर होणार बंद

भाविकांनी निर्माल्य शहरात इतरत्र, पुलांवर किंवा कोणत्याही जलप्रवाहात न टाकता स्वच्छ संस्थेच्या कचरावेचकांकडे द्यावे, असे आवाहन स्वच्छ संस्थेकडून करण्यात आले आहे. औंध गाव (राजीव गांधी पूल), शांता आपटे घाट, अब्दुल कलाम जलतरण तलाव, महादेव घाट, वाकेश्वर मंदिर गणपती घाट पाषाण, सोमेश्वरवाडी गणपती घाट पाषाण, एस एम जोशी पूल, ओंकारेश्वर (भिडे पूल), कात्रज तलाव, शाहू उद्यान जलतरण केंद्र, संगम घाट हौद आणि नदीपात्र, कात्रज घाट, थोरवे शाळा, भारती विद्यापीठजवळ, तुळशीबागवाले कॉलनी मैदान, धनकवडी टपाल कार्यालय, मुंढवा पूल, साईनाथनगर, वडगाव शेरी जुना घाट, वडगाव शेरी नवा घाट, इंदिरानगर पोलीस चौकी या ठिकाणी कचरावेचकांची नियुक्ती केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune more than 200 cleaning staff appointed for ganesh visarjan at more than 40 ghats pune print news apk 13 css
Show comments