पुणे : राष्ट्रीय लोकअदालतीत एक लाख १० हजार १९२ प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या दाव्यांतून ३९६ कोटी २ लाख ९९ हजार २०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. दाखल, तसेच दाखलपूर्व दावे निकाली काढण्यासाठी १३३ पॅनेल नियुक्त करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पॅनेलची संख्या देखील राज्यात सर्वाधिक होती, अशी माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली. दाखलपूर्व स्वरूपाचे दोन लाख १६ हजार ८६ दावे लोकअदालतीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७९ हजार ९५६ दावे निकाली काढण्यात आले. त्यातून ७६ कोटी २१ लाख ९४ हजार २५३ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. ७२ हजार ४७७ प्रलंबित प्रकरणांमधून ३० हजार २३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात ३१९ कोटी ८१ लाख ४ हजार ९४७ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

हेही वाचा : मराठा आरक्षणावरुन छावा संघटनेचा इशारा, “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुठल्याच नेत्याला आम्ही ध्वजारोहण…”

दाव्याचा प्रकार निकाली दाव्यांची संख्या

बँकेची कर्जवसुली             ३५५२

तडजोड पात्र फौजदारी गुन्हे २९३८५

वीज देयक             १५७

कामगार विवाद खटले ७१

भूसंपादन                  १०३

मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १४६

वैवाहिक विवाद             २८५

धनादेश न वटणे             २२१२

अन्य दिवाणी दावे             ९२४

पाणी कर                  ६८१८०

ग्राहक विवाद                १८

अन्य दावे                ५१८६

एकूण                    १,१०,१९२

हेही वाचा : ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर पर्यावरण पूरक मातीच्या गणेशमूर्ती; शिवसेनेचा उपक्रम

लोकअदालतीत तडजोड केल्यास पक्षकारांचा वेळ वाचतो. त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत नाही. लोकअदालतीच्या माध्यमातून दोन्ही बाजूंना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. लोकअदालतीच्या आयोजनात जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पोलीस, तसेच नागरिकांचे सहकार्य मिळाले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राज्यात सर्वात जास्त दावे निकाली काढण्याची परंपरा जपली आहे, असे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune more than one lakh cases solved by lok adalat recovered 396 crores pune print news rbk 25 css