पुणे : एका ३० वर्षीय महिलेच्या पित्ताशयातील एक हजारांहून अधिक खडे शस्त्रक्रिया करून काढण्यात आले. लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी प्रक्रियेच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया पुण्यातील रुग्णालयात केवळ २० मिनिटांत यशस्वीपणे करण्यात आली. कविता (नाव बदलले आहे) ही पुण्यातील रहिवासी असून, तिला गरोदरपणात ओटीपोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. तपासणीत तिच्या पित्ताशयात खडे तयार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे इतर अवयवांच्या कार्यात व्यत्यय निर्माण झाला होता. गर्भधारणा आणि येणाऱ्या प्रसूतिमुळे तिची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. प्रसूतिनंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिला बाळ झालेले असल्याने त्याला नियमित स्तनपान करावे लागत होते. त्यामुळे ती शस्त्रक्रियेनंतर त्वरित आपल्या घरी जाऊ शकेल, याचा विचार करण्यात आला. यासाठी लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी पद्धतीने तिच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून एक हजारांहून अधिक पित्ताचे खडे काढण्यात आले. लँपरो ओबेसो सेंटरमध्ये लॅप्रोस्कोपिक व बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी ही शस्त्रक्रिया केली.

हेही वाचा : Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेत अडथळे; तांत्रिक अडचणींमुळे दोन तास विलंब; ‘टीसीएस’ला कारणे दाखवा नोटीस

याबाबत डॉ. शशांक शहा म्हणाले की, रुग्णाला पित्ताचे खडे असल्यामुळे पोटदुखीचा त्रास वाढू लागला होता. तिच्या तपासणीत पित्त-मूत्राशयाच्या भागात एक अडथळा दिसून आला. सर्वसाधारणपणे या भागात मोठ्या प्रमाणात खडे जमा झाल्यामुळे हा अडथळा निर्माण होतो. तिच्यावर केवळ तीन पंक्चरसह लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी केली आणि ही प्रक्रिया २० मिनिटांत पूर्ण झाली. त्यानंतर तिला वेदना झाल्या नाहीत आणि शस्त्रक्रियेनंतर २० तासांच्या आत तिला घरी सोडण्यात आले. ती तिच्या बाळाला स्तनपान देखील करू शकली.

हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; दोन महिलांचा मृत्यू

पित्ताचे खडे कशामुळे तयार होतात?

पित्ताशयातील पित्तामध्ये कोलेस्टेरॉल, कॅल्शियम ग्लायकोकॉलेट आणि बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यास पित्ताचे खडे तयार होतात. ते पित्त मूत्राशयाच्या पोकळीत तयार होतात. ते लहान, मोठे एक किंवा अनेक असू शकतात. पित्त खड्यांच्या लक्षणांमध्ये आंबटपणा, जेवणानंतर पोटात गोळा येणे यांचा समावेश होतो. रक्तातील कोलेस्टेरॉल, जास्त चरबीयुक्त आहार, अनुवंशिकता, लठ्ठपणा, मधुमेह, बैठी जीवनशैली, संप्रेरकांतील बदल या कारणांमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. भारतीय लोकसंख्येमध्ये पित्ताचे खडे होण्याचे प्रमाण ५ ते १० टक्के आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune more than thousand stones removed from gall bladder of a woman after surgery pune print news stj 05 css