पुणे : गृहनिर्माण क्षेत्रात तेजीचे वारे असून, सप्टेंबर महिन्यात १६ हजार ४२२ घरांची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत ६५ टक्के वाढ नोंदविण्यात आली. घरांच्या विक्रीतून सरकारला ५८० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. सर्वाधिक मागणी परवडणाऱ्या घरांना दिसून आली.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मालमत्ता विक्रीचा अहवाल नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केला आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण १२ हजार २८६ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. एकूण विक्रीत परवडणाऱ्या घरांचा (२५ ते ५० लाख रुपये किंमत) सर्वाधिक ३४.४ टक्के वाटा आहे. याच वेळी ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांचा वाटा ३३.६ टक्के आहे. विशेष म्हणजे, १ कोटी रुपयांवरील घरांच्या विक्रीतही वाढ होताना दिसून येत आहे.
हेही वाचा : ‘त्या’ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी – आमदार रोहित पवार
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घरांच्या एकूण विक्रीत १ कोटी रुपयांवरील घरांचा वाटा नऊ टक्के होता. या वर्षी सप्टेंबरमध्ये हा वाटा ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची विक्रीही वाढली आहे. यंदा सप्टेंबरमध्ये अशा ११४ घरांची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत ५८ घरांची विक्री झाली होती. त्यात यंदा ९७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. एकूण विक्रीत हवेली तालुका, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील घरांचे प्रमाण ७५ टक्के आहे. याचबरोबर मावळ, मुळशी आणि वेल्हे तालुक्यातील घरांच्या विक्रीचे प्रमाण १५ टक्के आहे.
हेही वाचा : पोलिसांच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा आदेश अजित पवार यांच्याकडून, बोरवणकर यांच्या आत्मचरित्रात नाव न घेता आरोप
पाचशे ते आठशे चौरस फुटांच्या घरांना मागणी
पाचशे ते आठशे चौरस फुटांच्या घरांना सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण विक्री झालेल्या घरांमध्ये या घरांचे प्रमाण तब्बल ५१ टक्के आहे. त्या खालोखाल ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांचे प्रमाण २५ टक्के आहे. आठशे चौरस फुटांवरील घरांचे प्रमाण एकूण विक्रीत २४ टक्क्यांवर पोहोचले आहे.