पुणे : कर्करोगग्रस्त मुलीचा जीव वाचविण्यासाठी आईने त्याग केल्याचे उदाहरण समोर आले आहे. रक्ताचा कर्करोग असलेल्या मुलीला अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्यासाठी आई दाता बनली. यासाठी तिने गर्भपात करून मुलीला नवजीवन देण्याचे पाऊल उचलले.
शिल्पाला (नाव बदलले आहे) २०१६ मध्ये वयाच्या चौथ्या वर्षी ॲक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कर्करोग असल्याचे समोर आले. तिच्यावर अडीच वर्षे केमोथेरपीचे उपचार करण्यात आले. ती २०१९ पर्यंत बरी होताना दिसत होती, परंतु २०२० मध्ये तिला पुन्हा आजार उद्भवल्याचे निष्पन्न झाले. रुबी हॉल क्लिनिकमध्ये डॉ. विजय रामानन यांनी तिच्या अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा (बोन मॅॅरो ट्रान्सप्लान्ट) सल्ला दिला. मात्र, यासाठी खर्च जास्त होता. सुरुवातीला कुटुंब शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते. सरकार, स्वयंसेवी संस्थांच्या पाठिंब्यामुळे कुटुंब आवश्यक तो निधी मिळवू शकले आणि शिल्पावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.
हेही वाचा : आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू… राज्यात जागा किती, अर्ज भरण्यासाठी मुदत किती?
करोना संकटामुळे प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेत विलंब झाला. शिल्पासाठी आई दाता म्हणून समोर आली. त्याच वेळी आई गर्भवती असल्याचेही निष्पन्न झाले. आईला पेशी दान करायचे असल्यास गर्भपात करणे आवश्यक होते. आपल्या मुलीच्या प्रेमाखातर आईने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. अखेर अनेक अडथळ्यांवर मात करून शिल्पावर अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्यात आले.
हेही वाचा : राज्यात आता पानांची शेती शक्य, फळांपेक्षा पानांमध्ये जास्त पोषण मूल्याचा संशोधकांचा दावा
शिल्पाचा प्रवास रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखविलेल्या अविश्वसनीय दृढनिश्चयाचे उदाहरण आहे. तिच्या आईने केलेला त्याग मोठा होता. आता शिल्पाची प्रकृती सुधारत आहे.
डॉ. विजय रामानन, रूबी हॉल क्लिनिक