पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कांदा प्रश्नावर शरद पवार आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. “कांदा प्रश्नावर आज दिल्लीत बैठक होणार आहे. त्या बैठकीत तोडगा निघायला हवा. केंद्र सरकारचे काय डाव पेच आहेत, ते माहिती नाही. शेतकऱ्यांना चार पैसे काही मिळत असतील तर सरकारची धोरणं आड येतात. शरद पवार जाणकार नेते आहेत. यात राजकारण न आणता शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याची भावना समजून घेतली पाहिजे. सगळ्या जाती धर्मांचा हा प्रश्न असून शरद पवार उतरणार असतील तर केंद्र सरकार ने निर्णय घ्यावा”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, “मंत्र्यांच्या बंगल्यावर ज्या पंगती आहेत, त्यांची परवानगी घेतली आहे का ? राज्यात खोकेच्या खोके पचवले जातात. उद्या शरद पवार यांचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला जाणार आहे, या सरकारकडून आम्हाला काही अपेक्षा नाहीत. एक मंत्री आहेत, त्यांनी आज आदेश काढला आहे की लग्नाला कोणाला बोलवायचे असेल तर आधी अन्न आणि औषध विभागाची परवानगी घ्या”
हेही वाचा : देशातील शिक्षण मंडळांमध्ये आणखी एकाची भर… रामदेवबाबांच्या भारतीय शिक्षण मंडळाला मान्यता!
उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात सहभागी होणार
“विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सध्या सुरू आहे. आम्ही या सरकारचे अस्तित्व मानत नाहीत. भाजपने नवाब मलिक यांच्याबद्दल जशी भूमिका घेतली, मग तशी प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल का नाही घेतली ? प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत ते उत्तर देत नाहीत. इकबाल मिरची हा संत माणूस होता, दाऊद विश्व पुरुष होता, हे भाजप ने सांगावे. महाविकास आघाडी बनत असताना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायला अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांचा विरोध होता. उद्या सरकार पडलं तर उदय सामंत आमच्या दारात असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही”, असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.