पुणे : ‘पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, ‘पीएमआरडीए’ने खडकवासला धरणासह जिल्ह्यातील धरणांच्या स्वच्छ पाण्यासंबंधीचा सर्वंकष विकास आराखडा तातडीने तयार करावा,’ अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. हा आराखडा केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासमोर मांडला जाईल, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेतील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या भागात महापालिकेच्या प्रलंबित विकासकामांची माहिती घेण्यासाठी खासदार सुळे यांनी बैठक घेतली. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन दोडके, काका चव्हाण यांच्यासह समाविष्ट गावांतील नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत खडकवासला भागात असलेल्या लष्करी संस्था, तसेच या भागात नव्याने झालेली हॉटेल्स, गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट धरणांमध्ये सोडले जाते. मात्र, त्यावर महापालिका कोणतही ठोस भूमिका घेत नाही आणि कडक कारवाईदेखील करीत नसल्याची नाराजी उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केली होती. हाच मुद्दा घेऊन खासदार सुळे यांनी पुणेकर नागरिकांना आणि आजूबाजूच्या गावांनाही शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेसह पुणे जिल्हा परिषद आणि ‘पीएमआरडीए’ची असल्याचे स्पष्ट केले. यासाठी ‘खडकवासला धरणासह इतर धरणांबाबत सर्वंकष आराखडा तयार करावा,’ अशी सूचना केली.
‘शटल बसची खरेदी करा’
‘मेट्रोपर्यंत जा-ये करण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी पाच हजार बसची तातडीने खरेदी करण्याची गरज आहे. मेट्रोचा वापर वाढल्यास रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होईल,’ असा विश्वास खासदार सुळे यांनी व्यक्त केला.
‘समाविष्ट गावांचा प्रश्न मार्गी लावावा’
‘महापालिकेत आलेल्या ३४ गावांच्या मिळकत कराचा विषय गंभीर आहे. राज्य सरकारने निवडणुकीवेळी त्यावर स्थगिती दिली होती. आता, मात्र सरकार ३४ गावांच्या मिळकत कराबाबत काहीच बोलत नाही. त्याबाबत सरकारने अचानक काही निर्णय घेतल्यास सामान्यांना फटका बसेल. या गावांमधील रस्ते, पाणी, वीज यांसारखे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. हा प्रश्न मार्गी लावावा,’ अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.