पुणे : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) प्रस्तावित करण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्व मार्गावरील भूसंपादनाला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यानुसार खेड तालुक्यातील बाधित १२ गावांच्या शेतकऱ्यांनी भूसंपादन नोटिशीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून जमीन देण्यास संमतीपत्र देण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हेही वाचा : इंद्रायणी काठी, प्रदूषणाची आळंदी… दररोज ‘एवढे’ सांडपाणी मिसळते इंद्रायणी नदीत
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प करण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावरील जमिनींचे ६० टक्के भूसंपादन झाले आहे, तर पूर्वेच्या मार्गावर असणाऱ्या गावांमधील स्थानिकांना भूसंपादन नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. यांपैकी खेड तालुक्यातील १२ गावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रभाव क्षेत्रात येतात. या गावांमधील मूल्यांकन करताना जमिनीचे दर कमी निश्चित केल्याचे स्थानिकांकडून जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन मुदतवाढ द्यावी आणि फेरमूल्यांकन करावे, तोपर्यंत भूसंपादन नोटिशींना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाबाबत स्थापन केलेल्या समितीच्या आढावा बैठकीत मुदतवाढ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा : खाद्यान्न परवाना नूतनीकरणाची मुदत आता पुन्हा पाच वर्षे
दरम्यान, या बैठकीत पश्चिम मार्गावरील भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला. ३४ गावांपैकी ३२ गावांमधील भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. ७२१ हेक्टरपैकी ६५३ हेक्टर भूसंपादन पूर्ण झाले आहे, तर पूर्वेकडील १०५ हेक्टर जागेचे संपादन झाले आहे. हवेली, मुळशी, मावळ, भोर तालुक्यातील आतापर्यंत झालेल्या भूसंपादनापोटी १६०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.