पुणे : कौटुंबिक वादातून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त केले. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर रविवारी रात्री ही घटना घडली. घोरपडी परिसरातील निगडेनगर परिसरात एक तरुण आत्महत्या करत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी रात्री दहाच्या सुमारास मिळाली. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी प्रवीण होळकर, जगदीश महानवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. होळकर आणि महानवर यांनी तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखले. त्याची विचारपूस करून धीर दिला. तेव्हा कौटुंबिक वादातून आत्महत्या करत असल्याचे तरुणाने पोलिसांनी सांगितले. त्यानंतर होळकर आणि महानवर यांनी मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी यांना या घटनेची माहिती दिली.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो रामभक्तांचे सामूहिक रामरक्षा पठण
बोळकोटगी यांनी तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक बोळकोटगी यांनी तरुणाशी संपर्क साधला. त्याला धीर देऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार नाही, असे सांगितले. तरुणाने पोलिसांना लिखित स्वरुपात जबाब दिला. पोलिसांनी मनपरिवर्तन केल्याने आत्महत्येचा विचार भविष्यात डोकावणार नाही, असे तरुणाने जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त केल्याने नागरिकांनी पोलिसांची कौतुक केले आहे.