पुणे : महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत गरजू रुग्णांवरील उपचार, तसेच शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचा अनेक गरजूंना लाभ झालेला असून, नाना पेठेतील एका खासगी रुग्णालयाने या योजनेत उपचार घेण्यासाठी दिलेल्या दहा हमीपत्रांपैकी तीन रुग्णांच्या नोंदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी नाना पेठेतील एका डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी शरद प्रकाश चव्हाण (वय ३४) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाना पेठेतील एका डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पेठेतील क्वार्टर गेट चौकात संबधित रुग्णालय आहे, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
हे ही वाचा… राज्यात ‘निम्हन्स’च्या धर्तीवर मनोरुग्णालये; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून शहरी गरीब सहाय योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहायता योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांची तपासणी केली जाते. नाना पेठेतील क्वार्टर गेट चौकातील एका खासगी रुग्णालयाने दिलेल्या दहा हमीपत्रांपैकी केवळ तीन हमीपत्रधारक रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याची नोंद आढळून आली. रुग्ण उपचार घेत असल्याचे भासवून हमीपत्र घेण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले.
हे ही वाचा… काम न करणाऱ्यांची गय नाही! कामचुकार अधिकाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी घेतले फैलावर
न केलेल्या शस्त्रक्रियेचे बिल महापालिकेला सादर
संबधित रुग्णालयाने न केलेल्या शस्त्रक्रियेचे बिल महापालिकेला सादर करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. रुग्णांच्या नावे बनावट प्रकरणे तयार करुन महापालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संंबंधित डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.