पुणे : पूर्ववैमनस्य आणि तत्कालीन कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका तरुणावर मार्केटयार्ड परिसरात बुधवारी रात्री नऊ वाजता कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनेश उर्फ बाळासाहेब सुरेश रणदिवे (वय २८, रा. साईनगर गल्ली, अप्पर डेपो, बिबवेवाडी कोंढवा रस्ता) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, मार्केट यार्ड पोलिसांनी राहुल खुडे, सचिन खुडे (दोघेही रा. डायस प्लॉट गुलटेकडी), हनुमंत काबळे (रा. येवलेवाडी) आणि सुरजसिंग दुधाणी या चौघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विकास लक्ष्मण सातारकर (वय ५०, रा. पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्केटयार्ड येथील येवले एका शेडमध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.
पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेला तरुण दिनेश उर्फ बाळासाहेब रणदिवे आणि आरोपी राहुल खुडे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संघटनेच्या कामकाजावरून त्यांच्यात मतभेत होते. दरम्यान तीन दिवसांपूर्वी राहुल खुडे याच्यावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे बाळासाहेब याच्यावर राहुल खुडे चिडून होता. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी विकास, बाळासाहेब, महेश सकट, उमेश मोहिते, नीलेश थोरात आणि केतन क्षीरसागर असे मित्र मिळून मार्केटयार्ड येथील शेडमध्ये चहा घेत बोलत होते. त्यावेळी राहुल हा तेथे आला. ‘बाळ्या इकडे ये’ असे म्हणत राहुल हा मान पकडून बाळासाहेब यांना ओढत घेऊन गेला. राहुल याचा लहान भाऊ सचिन हा तेथे कोयता घेऊन आला होता. त्याने बाळासाहेब यांच्या डोक्यात वार केला. त्याचवेळी आरोपी दुधानी यानेही त्याच्याकडील कोयत्याने बाळासाहेब यांच्यावर वार केले. ‘बाळ्याला जिवंत सोडू नका त्याला खल्लास करा’, असे म्हणताच इतर आरोपींनी बाळासाहेब यांच्यावर वार केले.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या लोणावळ्यात
फिर्यादींनी हा प्रकार पोलीस नियंत्रण कक्षाला कळविला होता. पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत आरोपी फरार झाले होते. बाळासाहेब यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुरूवातीला याबाबत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, बाळासाहेब यांच्या मृत्यूनंतर खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.