पुणे : मागील काही महिन्यांपासून व्याख्याते नामदेव जाधव हे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. त्यावरून मध्यंतरी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले होते. त्या सर्व घडामोडीनंतर आता नामदेव जाधव हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक झाले असून शरद पवार यांनी ५० वर्षांच्या राजकीय कार्यकाळात सतत मराठा समाजाच्या विरोधात भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळू शकले नाही. समाजात कायम तेढ निर्माण करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ मार्चला बारामती येथील शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याची भूमिका पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत नामदेव जाधव यांनी मांडली.
हेही वाचा : वर्धापनदिन विशेष : किंग ऑफ व्हॅक्सिन
तसेच ते पुढे म्हणाले की, शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी मराठा समजाच्या आरक्षणाबाबत का निर्णय घेण्यात आला नाही. आजवर सत्तेच्या बाहेर ज्या ज्या वेळी शरद पवार गेले आहेत. त्यावेळी मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला आहे, त्यामागे शरद पवार असून मनोज जरांगे पाटील हे त्यांचीच भाषा वापरत असल्याचे सांगत शरद पवार यांच्यावर नामदेव जाधव यांनी टीका केली.