पुणे : लष्कर परिसरातील नामदेव शिंपी समाजाच्या जुन्या राममंदिराला नूतनीकरणाची नवी झळाळी लाभली आहे. मंदिराच्या सभामंडपातील लाकडी कोरीवकामाला पाॅलिश करण्यात आले असून, या नव्या संभामंडपामध्ये रविवारी (६ एप्रिल) रामजन्म सोहळा साजरा हाेणार आहे.
शहराच्या पूर्व भागातील महात्मा गांधी रस्त्यावर नामदेव शिंपी समाजाचे राममंदिर हे पुण्यातील पुरातन मंदिरांपैकी एक आहे. १८९१ मध्ये नामदेव शिंपी समाजाने ही जागा विकत घेण्यापूर्वी जुने राममंदिर अस्तित्वात होते. त्याचा जीर्णोद्धार १९१५ मध्ये म्हणजे ११० वर्षांपूर्वी करण्यात आला होता. हे मंदिर लाकडी बांधकामामध्ये असून, मंदिराचा सभामंडप लाकडामध्ये सुमारे ३० फूट उंचीचा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मंदिराच्या नूतनीकरणाचे काम मंदिराचे विश्वस्त ॲड. अनिल हिरवे यांनी हाती घेतले होते.
मंदिराच्या सभामंडपातील लाकडावरील रंग काढून टाकण्यात आला असून, त्यावर पाॅलिश करण्यात आले आहे. त्यापैकी बरेचसे लाकडी नक्षीकाम सभामंडपात लावण्यात आले आहे. हे काम शनिवारी (५ एप्रिल) पूर्णत्वास जाईल. नूतनीकरणामुळे मंदिराला नवी झळाळी प्राप्त झाली असून, या नव्या सभामंडपामध्ये रविवारी (६ एप्रिल) रामजन्म सोहळा साजरा होणार असल्याची माहिती हिरवे यांनी दिली.