पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे नाम फाउंडेशनचा ९ वा वर्धापनदिन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी राज्यभरातील नाम फाउंडेशनशी निगडित मोठ्या संख्येने सहकारी आले होते. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमांतून राज्यभरात करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमानंतर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आजवर राज्यभरात नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून नाना पाटेकर यांच नाव चर्चेत आहे. या संबंधी प्रश्नावर नाना पाटेकर यांनी स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा – पुणे : वडगाव शेरीतील बाजारपेठेत पाच दुकानांना आग
हा माझा किंवा आमचा कोणाचाच पिंड नाही. मी आयुष्यात कधीच राजकारणात नाही. पण त्यांच्याशी (राजकारण्यांशी) मैत्री करणार. कुणाशी मैत्री करायला हवी आणि कुणाशी नाही, हे देखील कळलं पाहिजे. सगळेच चांगले आहेत असे देखील नाही आणि सगळेच वाईट आहेत असे देखील नाही. राजकारणात खूप चांगली देखील मंडळी असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. राजकारणात न जाण्याचे नेमके कारण सांगायचे झाल्यास, मला पटले नाही तर मी पटकन बोलतो. त्यामुळे मला पटकन काढतील ना, गप्प राहिले पाहिजे, हे शिकता आले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील फुटीबाबत विचारले असता, हा प्रश्न नाम संदर्भातील आहे का ? अजित पवार कोणत्या पक्षाचे आहे, कोण काय करीत आहे, हा प्रश्न माझा नसून तो प्रश्न त्यांना विचारा. माझी सर्वांशी मैत्री आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याशी देखील माझी चांगली मैत्री आहे. त्यामुळे मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबाबत बोलत नाही. तसेच तुम्ही एखाद्या कामाचा वसा घेता त्यावेळी तुम्ही तुमचे काम करा, या कामांमध्ये काय चुकीचे आहे आणि वाईट आहे त्याबद्दल आपण बोलूयात. मला दुसर्याबाबत बोलण्याचा काय हक्क? असा प्रश्न देखील नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – सिंहगडाजवळ सांबारेवाडीतील हाणामारीत गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू
शरद पवार कित्येक वर्षे मोठे राजकारणी आहेत. तसेच अजित पवार त्यांच्या पद्धतीने खूप मोठे काम करत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे कोण कसा आहे. याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. तसेच देवेंद्र काय आहे आणि मोदीजी काय आहेत, ते चांगले आहेत की वाईट, त्यामुळे काहीही घडत नाही. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल बोलू नये, अशी भूमिका मांडत नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केल्याचे पाहण्यास मिळाले.