पुणे : पुण्यातील अनेक भाजपचे नेते माझ्या संपर्कात होते. सर्वेक्षणाचे अहवाल आपल्या बाजूने होता. मात्र, मतदानाच्या काही दिवस आधी मला पोलिसांचा अहवाल मिळाला. त्यात कोणी कोणाचे काम केले हे आहे. त्यामुळे पक्षात राहून बदमाशी करणाऱ्यांचा इलाज करणार, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहर काँग्रेसमधील पदाधिकारी, नेत्यांना शनिवारी दिला. लोकसभेतील पुण्याचा पराभव माझ्या जिव्हारी लागला असून, पुण्यासाठी कोणता पूजा-पाठ करायचा, हे माहीत नाही, अशा शब्दांत पटोले यांनी पक्षातील गटबाजीबद्दल अगतिकता या वेळी बोलून दाखविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेसचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी काँग्रेस भवन येथे शहर काँग्रेसची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये पटोले बोलत होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, कमल व्यवहारे, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुडे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : महिलांची संख्या वाढल्यास संसदीय संस्थांमध्ये सुधारणा, शरद पवार यांचे मत

पटोले म्हणाले, ‘पुणे आणि अकोला आपल्या हातून गेल्याचे माझ्या जिव्हारी लागले आहे. उमेदवार निवडणूक लढवत नाही, पक्ष लढवत असतो. अकोला आणि पुण्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. पुण्यासाठी मला कोणती पूजा-पाठ करावी लागेल काय माहीत? लोकसभा निवडणुकीत पक्षातील कोणी बदमाशी केली, हे मला माहीत आहे. त्यावर मी इलाज करणार आहे. माझ्याशिवाय पक्ष चालू शकत नाही, असे कोणाला वाटत असेल, तर ते मनातून काढून टाका. लोक काँग्रेसला मत द्यायला तयार असून, आपण घ्यायला तयार नाही, अशी पुण्यात स्थिती आहे. लवकरच मतदान केंद्रप्रमुखांना मी स्वतंत्र भेटून प्रभागनिहाय आढावा घेणार आहे. महापालिका आणि विधानसभा जिंकण्यासाठी आपण लढणार आहोत, त्यासाठी आतापासून तयारीला लागा. घराघरापर्यंत जाऊन संपर्क करा.’

हेही वाचा : शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू

काँग्रेसमध्ये येण्यास अनेक जण इच्छुक

पुण्यात आपण हरलो, तरी अनेक जण आपल्या पक्षात यायला तयार आहेत. मित्र पक्षांनी शहरातील विधानसभेच्या सहा जागा मागितल्या म्हणून विचलित होऊ नका. आपल्याबद्दल जेवढे चांगले मत बनेल, तेवढेच पक्षाबाबत चांगले मत बनते, हे सूत्र ठेवून कामाला लागा. मोदी सत्तेवर येऊ शकत नाही, हे लोकसभेच्या निकालांवरून सिद्ध झाले आहे. सध्याचे केंद्र सरकार पंगू आहे, हे मतदारांपर्यंत पोहोचवा. त्याकरिता मतदान केंद्रप्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना उद्दिष्ट द्या, अशा सूचनाही पटोले यांनी या वेळी केल्या.

हेही वाचा : सुप्रिया सुळे यांचे वाढत्या रील्सवर भाष्य… म्हणाल्या, पाच मिनिटे…

फलकावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

प्रदेशाध्यक्ष पटोले हे शहर काँग्रेसची आढावा बैठक घेणार असल्याने पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काँग्रेस भवन येथे गर्दी केली होती. शहर काँग्रेसमध्ये पदांवर ठाण मांडून बसलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केला जाणार का, अशा आशयाचा फलक राहुल प्रियंका गांधी सेनेचे प्रदेशाध्यक्ष मुकेश धिवार हे घेऊन आले होते. त्यांना अचानक चार-पाच जणांनी जबर मारहाण केली आणि काँग्रेस भवनातून पलायन केले. या प्रकारामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.

एकजण ताब्यात

धिवार यांना मारहाण झाल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काँग्रेस भवन येथे बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी तत्काळ धिवार यांना मारहाण करणाऱ्यांपैकी एकास ताब्यात घेतले. योग्य ती कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.