पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यभरात मेळावे आयोजित केले जात आहेत. त्याच दरम्यान पुण्यातील अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली काल मंगळवारी सेंट्रल पार्क येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास राष्ट्रवादी व्यापारी सेल प्रदेशाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष, माजी महापौर, माजी नगरसेवक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजे. तसेच राज्यपाल नियुक्त दीपक मानकर यांना विधान परिषदेवर पाठविण्यात यावे, असे दोन ठराव या मेळाव्यात मंजूर करण्यात आले. पण या मेळाव्यात पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी दांडी मारल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चेतन तुपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चालक गंभीर

वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, माझी तब्येत ठीक नसल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही. काळजी करू नका, मी अजितदादा सोबत आहे आणि अजितदादा सोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.