पुणे: मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकाश आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी झाल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी फोनद्वारे प्रकाश आंबेडकर यांची विचारपूस केली. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौर्यावर होते. त्यावेळी शिवाजीनगर येथील प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन अजित पवार यांनी तब्येतीची विचारपूस केली.
हेही वाचा :विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टरांचा जाहीरनामा! राजकारण्यांकडे केलेल्या मागण्या जाणून घ्या…
या भेटीनंतर अजित पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करण्यासाठी आलो होतो. आमच्या दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चांगल्या प्रकारे चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत चांगली असून ते ९ तारखेपासून राज्यात प्रचारासाठी बाहेर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.