पुणे : मराठा समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार, मंत्री छगन भुजबळ यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई येथे समता परिषदेच्या मेळाव्यात मराठा समाजाच्या भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये तत्काळ मागे घेऊन माफी मागावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी सतीश काळे यांनी ॲड. अतुल पाटील यांच्यामार्फत भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. काळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नुकतेच पिंपरी- चिंचवड येथे बेमुदत उपोषण केले होते. मराठा आरक्षणाची मागणी जातीच्या किंवा व्यक्तीच्या विरुद्ध नाही. असे असताना देखील भुजबळ दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करत आहेत. १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेविषयी कुचेष्टा करणारी, तसेच मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली, असे काळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : पुणे: टँकरच्या धडकेत दुचाकीवरील जुळ्या मुलींचा मृत्यू; आई गंभीर जखमी

‘तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री असून तुम्ही मंत्री पदाच्या शपथेचा देखील भंग करत आहात. त्यामुळे समता परिषदेच्या मेळाव्यात भाषण करताना आंतरवाली सराटी येथील सभेबद्दल कुचेष्टा करणारी वक्तव्ये त्वरित मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करु’, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader