पुणे : अजित पवारांना देवेंद्र फडणवीस हे आत्ता मुख्यमंत्री करणार नाहीत. कारण, त्यांना ‘पुन्हा’ हा शब्द खूप आवडतो, असं म्हणत शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. ज्या शरद पवार यांनी पक्ष उभा केला. नेत्यांना १८ वेळेस मंत्रिपद दिली. तेच नेते आता स्वार्थी राजकारणासाठी खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार यांना पक्षाबाहेर काढण्याचं काम करत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांवर शरद पवार यांचा विश्वास असून आगामी काळात शंभर टक्के शरद पवार यांचा विजय होईल असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवार गटाला मला ट्रोल करण्याशिवाय दुसरं काही काम नाही. ज्या वडिलांनी मुलांसाठी घर बांधलं, मुलं मोठी केली त्याच वडिलांना बाहेर जा म्हणत आहेत, असा टोला त्यांनी अजित पवार गटाला लगावला. शरद पवार यांना इलेक्शन कमिशनमध्ये जावं लागलं. ज्यांना अठरा वर्ष मंत्री पद दिलं तेच नेते आता राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांचा नसून त्यांचा आहे, असा दावा करत आहेत. कालपर्यंत जे नेते भाजपाला हुकूमशाह म्हणत होते तेच आज वकिलामार्फत शरद पवार यांना हुकूमशहा म्हणत आहेत. हे केवळ स्वार्थी राजकारणासाठी सुरू असल्याचे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा : सातारा येथील दंगल घटनेचा तपास सीबीआय आणि एनआयए मार्फत व्हावा, भारतीय मानवाधिकार परिषदेची मागणी
ते पुढे म्हणाले, शरद पवार यांचा फोटो वापरता येत नसल्याने अजित पवार गट यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरत आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शरद पवार यांनी प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी पक्ष उभारला आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आज अजित पवार गटाला यशवंतराव चव्हाण यांचा फोटो फ्लेक्सवर वापरावा लागत आहे. जेव्हा, ते चुकीचे काम करतील तेव्हा आत्मक्लेष करण्यासाठी कराडला जाण्याची गरज नाही. कारण पोस्टरवरच यशवंतराव चव्हाण यांचा फोटो असेल, असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा : फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य
ज्या छोट्या पक्षांना वाटत असेल की संविधान हे महत्त्वाचं आहे, सर्वसामान्य लोकांचे हित आणि त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. ते छोटे पक्ष उमेदवार उभे करत असताना भाजपला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची दक्षता घेतील आणि त्याचप्रमाणे उमेदवार उभे करतील. भाजपा हा संविधान विरोधी पक्ष आहे, असं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे भाजपाला मदत होणार नाही, याची काळजी मनसेसह इतर पक्ष नक्कीच घेतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.