पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी मात्र असा कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र काही दिवसांपासून ते अजित पवार यांची साथ सोडणार असून शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा होती. त्यातच सोमवारी सकाळी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लंके यांचा पक्षप्रवेश होईल,अशी चर्चा सुरू होती.
नीलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाबाबत शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले असता ते म्हणाले की, कुठे आहे घेऊन या ना, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच ते पुढे म्हणाले की, मी तुमच्याकडून ही चर्चा ऐकली असून या चर्चेला काही अर्थ नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. मात्र या सर्व घडामोडी दरम्यान शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी पुण्यात भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हेही वाचा : रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईनंतर शरद पवार सरसावले, भाजपच्या सत्ताकाळातील ईडीच्या गैरवापराचा तपशील जाहीर
त्या भेटीबाबत खासदार अमोल कोल्हे यांच्याशी लोकसत्ता डॉट कॉमच्या प्रतिनिधीने संवाद साधून या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले की, माझी आणि निलेश लंके यांची भेट झाली आहे. आम्हा दोघांची नेहमीच भेट होत आली आहे. आज देखील तशीच भेट झाली आहे. आमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महायुतीच्या जागावाटपाबाबत ते म्हणाले की, लोकसभेच्या जागा वाटपावरुन भाजप मित्र पक्षांना जी वागणूक देत आहे, त्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचे दिसून येत असल्याचे सांगत भाजपवर त्यांनी निशाणा साधला.