पुणे : महापौर बंगल्याला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वाहिनीवर जलमापक बसविण्यात आले असले तरी, या वाहिनीतून बंगल्यामध्ये पाणीपुरवठा होत नसून घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या वाहिनीतून पाणीपुरवठा होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महापौर बंगल्यातील जलमापक शोभेचे ठरत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाकडून करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त बंगला, महापौर बंगला, जिल्हाधिकारी कार्यालय बंगला येथे पाण्याचा वापर किती आहे, हे समजण्यासाठी अन्य पुणेकरांप्रमाणेच जलमापक बसविण्यात यावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महापौर बंगल्यातील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी जलमापक बसविण्यात आले असले तरी, ते शोभेचे असल्याचे वेलणकर यांना आढळून आले.
हेही वाचा : विधानपरिषदेसाठीच आबा बागुल यांची भाजप बरोबर जवळीक ?
महापौर बंगल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीवर जलमापक बसविण्यात आले आहे. मात्र त्यातून पाणीपुरवठा होत नाही, तर शेजारील घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातून घेण्यात आलेल्या जलवाहिनीतून बंगला परिसराला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला आदेश देऊन महापौर बंगला, आयुक्त आणि जिल्हाधिकारी बंगल्याबरोबरच अन्य वरिष्ठ सरकारी, निमसरकारी बंगल्यात तातडीने जलमापक बसविण्यात यावेत आणि या सर्व ठिकाणी दरडोई दर दिवशी १५० लिटरपेक्षा कमी पाणी वापर होत असल्याची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.