पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत शहरात सर्वच ठिकाणी आवाजाच्या पातळीने ध्वनिप्रदूषणाची कमाल मर्यादा ओलांडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मोजण्यात आलेल्या ध्वनिपातळीतून हे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शहरातील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली जात आहे. हे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेने राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या साह्याने ध्वनिप्रदूषण पातळी मोजण्यास सुरुवात केली आहे. दररोज सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ही पातळी मोजली जाते. ध्वनिप्रदूषणाची कमाल मर्यादा पातळी दिवसा ७५ डेसिबल आणि रात्री ७० डेसिबलपर्यंत आहे. शहरात सर्वच ठिकाणी आवाजाची पातळी ७५ ते ८५ डेसिबलदरम्यान नोंदविण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरभर ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे: शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद, मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. कल्याणी मांडके यांनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. यात राज्य सरकार, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांना प्रतिवादी करण्यात आले होते. पुण्यात गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळासह पुणे पोलिसांना ध्वनिप्रदूषण कमी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रत्येक गणेश मंडळाला १०० वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक लावण्यास राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आणि ढोल-ताशा पथकात ३० पेक्षा जास्त वादकांचा समावेश करण्यास मनाई केली.

आवाजाची मर्यादा पातळी

विभागदिवसारात्री
औद्योगिक७५७०
व्यावसायिक६५५५
निवासी५५४५
शांतता क्षेत्र५०४०

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवाजाची पातळी तपासली जात आहे. ही पातळी जास्त असल्यास पोलिसांशी संपर्क साधून गणेश मंडळाला आवाज कमी करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. ढोल-ताशा पथकात ३० पेक्षा जास्त वादक नसावेत, या नियमाची अंमलबजावणी पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे.

जगन्नाथ साळुंके, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune noise pollution violation at 200 ganesh mandal during ganeshotsav 2024 pune print news stj 05 css