पुणे : करोना संकटानंतर देशातील प्रमुख महानगरांमध्ये जागांना मागणी वाढली आहे. निवासी प्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी जमिनीच्या मोठ्या व्यवहारांत या वर्षी वाढ झाली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ५९ मोठे व्यवहार झाले असून, दोन हजार १८ एकर जागेची विक्री झाली आहे. सर्वाधिक १७ व्यवहार मुंबईत झाले असून, पुण्यात पाच व्यवहार झाले आहेत. हे व्यवहार शेकडो कोटी रुपयांचे आहेत.
मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था ‘अनारॉक’ने याबाबतचा अहवाल सोमवारी जाहीर केला. यानुसार, देशात जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ५९ व्यवहार झाले. मागील वर्षी याच कालावधीत ५९ व्यवहार एकूण १ हजार ४३८ एकरचे झाले होते. यंदा पाच व्यवहार टाऊनशिप प्रकल्पांसाठी झाले असून, ते एकूण १ हजार १३६ एकरचे आहेत. चेन्नई, अहमदाबाद आणि लुधियानामध्ये या टाऊनशिप उभ्या राहत आहेत. निवासी प्रकल्पासांठी ३८ व्यवहार झाले आहेत. त्यात निवासी प्रकल्प २८३ एकर, भूखंड विकसन १५४ एकर, संमिश्र वापर ६२ एकर यांचा समावेश आहे.
संमिश्र वापरासाठीचे ४ व्यवहार असून, ते नोएडा, गुरूग्राम, पुणे आणि बंगळुरूमध्ये झाले आहेत. चेन्नई, रायगड आणि गुरूग्राममध्ये १५४ एकरच्या भूखंड विकसनाचे ३ व्यवहार झाले आहेत. व्यावसायिक वापरासाठीचे १६.५ एकरचे ३ व्यवहार दिल्ली, नोएडा आणि गुरूग्राममध्ये झाले आहेत. बंगळुरूमध्ये उत्पादन प्रकल्पासाठी ३०० एकरचा व्यवहार झाला आहे.
जागांचे मोठे व्यवहार
- मुंबईत आरोग्य भारती हॉस्पिटलकडून २३ एकरसाठी ५४० कोटी रुपये
- मुंबईत सुप्रीम युनिव्हर्सलकडून ५ एकरसाठी ३११ कोटी रुपये
- पुण्यात व्हीटीपी रिअॅलिटीकडून थेरगावमधील ६.७ एकरसाठी २६० कोटी रुपये
- गोदरेज प्रॉपर्टीजकडून चेन्नईत ६० एकरसाठी १०० कोटी आणि गुरूग्राममध्ये ७.९१ एकरसाठी ९०० कोटी रुपये
- बंगळुरूत फॉक्सकॉनकडून ३०० एकरसाठी ३०० कोटी रुपये
- अहमदाबादमध्ये अदानी इन्फ्रास्ट्रक्चरकडून ३५.८३ एकरसाठी ३२५ कोटी रुपये
हेही वाचा : “आमच्याकडून संग्राम थोपटेंवर अन्याय झाल्यासारखं वाटतं, पण…”, काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान
देशातील जागांचे मोठे व्यवहार
शहर – एकूण जागा (एकरमध्ये) – व्यवहारांची संख्या
अहमदाबाद – ७३९ – ३
बंगळुरू – ४०१ – ८
चेन्नई – १७७.७४ – ५
दिल्ली – ८९.८२ – १३
साणंद (गुजरात) – ३८ – १
हैदराबाद – १८.६ – २
कोलकता – २४.८८ – ३
लुधियाना – ३०० -१
मुंबई – ९५.४६ – १७
पुणे – ४३.९६ – ५
रायगड – ८९ – १
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जमिनींचे मोठे व्यवहार वाढले आहेत. अहमबादमध्ये आकारमानानुसार सर्वांत जास्त जमिनीचे व्यवहार झाले असून, त्याखालोखाल लुधियाना आणि बंगळुरूत झाले आहेत. निवासी प्रकल्पांसाठीच्या व्यवहारांची संख्या सर्वाधिक आहे, असे अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी म्हटले आहे.