पुणे: राज्यातील महायुती सरकारचा काल नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहर्‍याना संधी देण्यात आली. मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका मांडली असून अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करावे आणि छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलून ओबीसी समाजाच्या मतांचा अजित पवार यांनी अपमान केला असल्याचा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

हेही वाचा : पुणे : महापालिकेविरोधातील दावा तडजोडीत निकाली

यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, नागपूर येथे काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले. यामुळे ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला. पण दुसर्‍या बाजूला मागील कित्येक वर्षांपासून ओबीसी समाजाला न्याय मिळावा, यासाठी छगन भुजबळ हे कायम संघर्ष करीत राहिले असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. तसेच दुसर्‍या बाजूला गोपीचंद पडळकर यांना देखील मंत्री मंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे ओबीसी समाजात प्रचंड नाराजी आहे. यामुळे या दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले आहे. याबाबतच उत्तर राज्यातील ओबीसी समाजाला देण्यात यावं , अशी समाजाची मागणी आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सभासद म्हणून छगन भुजबळ असून त्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आले. त्यामागे नेमकी कोणती कारणे होती. याबाबत अजित पवार यांनी समोर येऊन उत्तर द्यावे, अडीच वर्षाच्या मंत्रिपदाचा पायंडा पाडणारे अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री देणार असल्याचे पुढे सांगावे, आम्ही सर्व शांत बसू आणि छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

हेही वाचा : गायक संजय मराठे यांचे निधन

तसेच ते पुढे म्हणाले की, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन(छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर) या दोघांचा बळी घ्यायचा, ही अजित पवार यांची जातीयवादी मानसिकता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने राज्यातील ओबीसी जनतेने मतदान केले आहे. त्या मतदानाचा अजित पवार यांनी अपमान केला असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune obc leader laxman hake demand ajit pawar to make chhagan bhujbal deputy chief minister for two and half years svk 88 css