पुणे : कर्वे रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

केशव बाबुराव मुंगे (वय ५१, रा. कुदळे पाटील आंगण, वडगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई मुक्ता घोटे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मुंगे हे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार मुंगे यांना धडक दिली. अपघातात मुंगे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी तपास करत आहेत.

कर्वे रस्ता गजबजलेला रस्ता आहे. दिवसा, तसेच रात्रीही या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. कर्वे रस्त्यावर कोथरुड बसस्थानक परिसरा रस्ता ओलांडणारी तरुणी आरती सुरेश मनवाने (वय २३, रा. एरंडे हाॅस्टेल, भेलके नगर, कोथरूड) हिचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी घडली होती. रसशाळा चौकात १९ ऑगस्ट २०२४ रोजी सायकलस्वार निवृत्त कृषी अधिकारी सुनील भास्करराव देशमुख (वय ६०, रा. निको गार्डन, विमाननगर) यांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. रससाळा चौकात जून महिन्यात जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी कृष्णा गणपती देवळी (वय ६७, रा. कोथरूड) यांचा मृत्यू झाला होता. गेल्याा वर्षी ९ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेल्या टेम्पोचालकाने सहा वाहनांना धडक दिल्यची घटना घडली होती. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी गीतांजली श्रीकांत अमराळे (वय ३५, रा. शास्त्रीनगर,कोथरुड) यांचा मृत्यू झाला होता. अपघातात दुचाकीस्वार श्रीकांत गंभीर जखमी झाले होते.