पुणे : नगर रस्त्यावरील अर्धवट स्थितीत असलेली ‘बस रॅपिड ट्रान्सपोर्ट’ (बीआरटी) काढण्यास महापालिकेने अखेर सुरुवात केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील बीआरटी अर्धवट अवस्थेत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत होती. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन तातडीने ही बीआरटी काढून टाकण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.

नागरिकांना कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या भागात जाता यावे, यासाठी काही प्रमुख रस्त्यांवर बीआरटी मार्ग तयार करण्यात आले आहेत. यामध्ये नगर रस्त्याचाही समावेश होता. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. मात्र, नगर रस्त्यावरील अनेक ठिकाणी बीआरटीच्या प्रकल्पांमुळेच वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत होते. ‘लोकसत्ता’ने या बीआरटी मार्गाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

या पार्श्वभूमीवर नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढून टाकावा, अशी मागणी वडगावशेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांनी लावून धरत जोरदार पाठपुरावा सुरू केला होता. काही महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावरील काही भागांतील बीआरटी काढून टाकण्यात आली होती. सोमनाथ नगर चौक ते खराडी जुना जकात नाक्यादरम्यानची बीआरटी काढण्यात न आल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते. ही अर्धवट स्थितीत असलेली बीआरटी तत्काळ काढावी, अशी मागणी टिंगरे यांनी शिष्टमंडळासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्या आठवड्यात केली होती. त्यावेळी पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांना तातडीने ही बीआरटी काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

हा तीन किलोमीटरचा बीआरटी मार्ग आहे. पहिल्या टप्प्यात सोमनाथनगर चौक आणि खराडी बायपास चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारा बीआरटी मार्ग आणि बस स्थानके हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हा मार्ग काढल्यानंतर पुढच्या टप्प्यात उर्वरित बीआरटी मार्ग काढण्यात येणार असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, अशी माहिती माजी आमदार टिंगरे यांनी दिली.

बीआरटी मार्गामुळे नगर रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. हा रस्ता बीआरटीमुक्त करावा, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. बीआरटी काढून टाकली जात असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.- सुनील टिंगरे, माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)