लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : रिक्षा आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षातील एक प्रवाशी ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कात्रज जुन्या बोगद्यातून पुढे मांगडेवाडी परिसरात बुधवारी (५ फेब्रुवारी) दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामध्ये अर्जुन राय यांचा मृत्यू झाला असून विजयकुमार यादव गंभीर जखमी झाला आहे. सरोजकुमार सदाय (वय ३८ रा. वेळू ता. भोर जि. पुणे) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिक्षा आणि डंपर चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष बेदरकारपणाने डंपर चालवला. तर, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवून रिक्षाचालकाने भरधाव वेगाने रिक्षा चालविली. मांगडेवाडी परिसरात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन रिक्षामध्ये बसलेला फिर्यादीचा साडु आणि मेहुणी असे किरकोळ जखमी झाले. अर्जुन राय यांचा मृत्यू झाला असून विजयकुमार यादव गंभीर जखमी झाला. या मृत्यूस दोन्ही वाहनांचे चालक हे कारणीभूत ठरले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. दोडमिसे तपास करीत आहेत.