पुणे : अश्वशर्यतीवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या चौघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सट्टेबाजीसाटी वापरलेले मोबाइल संच, तसेच ‘रेसिंग बुक’ असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहमूद इब्राहिम शेख, फैज मेहमूद शेख (वय २९, दोघे रा. फातिमानगर, वानवडी), चाँद शमशुद्दीन शेख (वय २९, रा. वानवडी), अकबर अन्वर खान (वय ४६, रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंबईतील रेसकोर्सवर सुरू असलेल्या अश्वशर्यतींवर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी कांबळे यांना मिळाली.

त्यानंतर पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि पथकाने फातिमानगर भागातील एका सदनिकेत छापा टाकला. तेव्हा सदनिकेत फैज, चाँद, अकबर हे मोबाइलवर ऑनलाइन सट्टा घेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा फैज याने वडील मेहमूद सट्टेबाजीचा व्यवहार सांभाळत असल्याची माहिती दिली. सदनिकेतून फैज, मेहमुद, चाँद, अकबर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरलेले मोबाइल संच, तसेच रेसिंग बुक जप्त करण्यात आले.

अश्वशर्यंतीवर ऑनलाइन सट्टेबाजीस बंदी आहे. आरोपी मेहमूद ऑनलाइन सट्टेबाजीचे सर्व व्यवहार सांभाळायचा. सट्टेबाजांना शर्यत संपल्यानंतर पैसे दिले जायचे. मुंबईतून दर सोमवारी पैसे मिळायचे. हे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने मोबाइलवर सुरू असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू आहे.