पुणे : पुण्यात ९ जानेवारीपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाला होता. त्यानंतर जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. आता जीबीएसचा उद्रेक ओसरला असून, गेल्या ४ दिवसांत पुणे परिसरात केवळ एका नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे.
पुण्यात नांदेड गाव परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. आता पुण्यासह राज्यभरात जीबीएसचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण गेल्या दोन आठवड्यांपासून कमी झाले आहे. राज्यात २ ते ५ मार्चदरम्यान जीबीएसचा केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. यामुळे जीबीएसचा उद्रेक ओसरल्याचे दिसून येत आहे. राज्यात जीबीएसचे आतापर्यंत २२३ रुग्ण आढळून आले असून, त्यातील १९५ रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. पुण्यातील जीबीएसचे आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले असून, त्यात पुणे महापालिका ४५, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका ३३, पुणे ग्रामीण ३६ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २९ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याचबरोबर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात १७४ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जीबीएसमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
सरकारी मदत बंद होणार
शहरात जीबीएस रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या आजाराचे फारसे रुग्ण सापडत नसल्याने ‘जीबीएस’बाधितांना महापालिकेच्या वतीने देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केला आहे. महापालिकेकडून शहरी गरीब योजनेसाठी पात्र रुग्णांना दोन लाख रुपये, तर पात्र नसलेल्या रुग्णांना एक लाखापर्यंतची मदत महापालिकेकडून देण्यात येते. मात्र, महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास ‘जीबीएस’बाधितांना एक मार्चपासून आर्थिक मदत मिळणे बंद होण्याची शक्यता आहे.
जीबीएसचा उद्रेक
एकूण रुग्णसंख्या – २२३
रुग्णालयात दाखल – ३८
अतिदक्षता विभागात – २९
व्हेंटिलेटरवर – १४
बरे झालेले रुग्ण – १७४
मृत्यू – ११