पुणे : पुरंदर तालुक्यातील कोडित गावात पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या अफूच्या शेतीनंतर पुन्हा मावाडी गावातील शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोनजणांना अटक केली असून, त्यांच्याकडून पाऊण लाख रुपये किमतीची ३८ किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली.
अफूची विनापरवाना शेती केल्याप्रकरणी किरण कुंडलिक जगताप (वय ४०) आणि रोहिदास चांगदेव जगताप (वय ५५, दोघे रा. कोडित बुद्रुक, ता. पुरंदर, जि. पुणे ) यांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेजुरी आणि भोर पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. कोडित गावात पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकून अफूची शेती उघडकीस आणली. याप्रकरणी दोन ज्येष्ठ नागरिकांना अटक करण्यात आली होती.
हेही वाचा…नवीन कात्रज बोगद्याजवळ दुचाकी घसरून शाळकरी मुलाचा मृत्यू; अपघातात दुचाकीस्वारासह महिला जखमी
त्यानंतर मावडी गावात शेतात अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संपूर्ण शेताची पाहणी केली. त्यात कांदा आणि लसणाच्या पिकांमध्ये अफूची झाडे लावण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी जगताप यांना अटक करण्यात आली असून, जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.