पुणे : तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डाॅ. तारा भवाळकर यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने होणारा सत्कार स्वीकारू नये, अशी विनंती खुद्द नियोजित संमेलनाध्यक्षांनाच करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डाॅ. भवाळकर यांना साकडे घातले आहे.

नियोजित संमेलनाध्यक्षांचा पहिला सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्याची प्रथा आहे. त्यानुसार परिषदेचे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते बुधवारी डाॅ. भवाळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मात्र, परिषदेच्या कार्यकारिणीचे अस्तित्वच घटनाबाह्य असल्याने परिषदेच्या वतीने होत असलेल्या सत्कार कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून आता सत्कार स्वीकारू नये, असे साकडे डाॅ. भवाळकर यांना घालण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, कार्याध्यक्ष प्रा. धनंजय कुलकर्णी, सचिव सुनील भंडगे आणि निमंत्रक शशांक महाजन यांनी भवाळकर यांना पत्र पाठवून यासंदर्भातील भूमिका मांडली आहे.

हेही वाचा : विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर हल्ला, पोलिसांकडून गोळीबार

परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीचा निवड कालावधी २०२१ मध्ये संपला आहे. या कार्यकारिणीने संस्थेच्या घटनेचा द्रोह करून स्वतःचा कार्यकाळ वाढवून घेतला आहे. परिणामी सार्वजनिक विश्वस्त कायद्या विरोधातील कामकाज करणाऱ्या परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाकडून आपण सत्कार स्वीकारू नये, अशी विनंती भवाळकर यांना करण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली महिलेसह दोघांची आत्महत्या

काय म्हटले आहे पत्रात

आपला लोकशाही व्यवस्थेवर विश्वास आहे. परिषदेचे कामकाज घटनेच्या तरतुदीनुसार चालणे अवश्यक आहे. आपण प्रस्थपित कायद्याचा आदर करता. आपण जन चळवळीत विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकर्षाने भूमिका मांडली आहे. सामाजिक प्रश्नांवर मर्मभेदी लेखन केले आहे. या आपल्या लेखन कार्याशी सुसंगतता राहावी यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून आपण सत्कार स्वीकारू नये असे आवाहन आम्ही आपणास या पत्राद्वारे करत आहोत, असे पत्रात नमूद करतानाच डाॅ. भवाळकर यांना अध्यक्षपदाच्या कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.