पुणे : ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असा लौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. उंदरांनी चावा घेण्यासह चादरीही कुरतडल्या असून, उंदरांशिवाय ढेकणांचाही त्रास असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल घेऊन उपाययोजना केल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृह जी-६ मधील २२ क्रमांकाच्या खोलीत राहणाऱ्या महेश जाधव या विद्यार्थ्याला चार वेळा उंदराचा चावा सहन करावा लागला आहे. उंदराच्या चाव्यामुळे महेशला दोन दिवसांसाठी औंध जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्याची वेळ आली होती. हाताला, पायाला उंदराच्या चाव्यामुळे गंभीर जखमा झाल्या असून, रेबीजची लक्षणे जाणवत आहेत. खाण्याचे पदार्थ, शैक्षणिक साहित्य, इतकेच काय तर अंगावरची चादरही उंदराने कुरतडल्याचे महेशने सांगितले. शैक्षणिक साहित्यासोबतच पिशव्या, कपडेही उंदरांनी कुरतडले आहेत. ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही गांभीर्याने उपाययोजना केल्या जात नसल्याचे राजेंद्र भोसले या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.
वसतिगृहात उंदरांशिवाय ढेकणांचाही त्रास आहेच. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवली जात नाही. वसतिगृहाच्या खानावळीत चांगले जेवण मिळत नाही. त्यात कधी झुरळ, तर कधी अळी सापडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वसतिगृहात उंदीर, ढेकणांचा त्रास होत असताना आता मुख्य इमारतीमधील कुलगुरू कार्यालयात वास्तव्यास जायचे का, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
उंदरांच्या उपद्रवाबाबतची तक्रार नोव्हेंबरमध्ये दाखल झाली होती. त्याची दखल घेऊन तातडीने पेस्ट कंट्रोल करण्यात आले. उंदरांचे मार्ग बंद करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना खोल्याही बदलून देण्यात आल्या आहेत.
डॉ. ज्योती भाकरे, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ